To Read This News In English Please Click Here
जगातील बहुतांश वेबसाइटच्या पत्त्याचा शेवट होतो तो डॉट कॉमने. मात्र ते दिवस संपत आलेत. येत्या २१ ऑगस्टपासून '.भारत' नावाची नवी देवनागरी लिपीमधली डोमेनसेवा सुरू होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त देवनागरीच नाही तर तब्बल २२ भारतीय लिपींमध्ये ( 22 Indian Scripts ) ही डोमेनसेवा उपलब्ध असेल.
इंटरनेटच्या युगात भारतीय भाषांची अस्मिता टिकवण्याच्या दृष्टिने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गेली पाच-सहा वर्षे या प्रकल्पावर काम होत होते. आता हे काम पूर्ण झाले असून, येत्या २१ ऑगस्टपासून ही सेवा सुरू होईल.
दक्षिण कोरियातील सेउल ( Seoul ) येथे २००९ मध्ये झालेल्या परिषदेच्या शेवटच्या दिवशी इंटरनेट हे माध्यम आणखी लोकाभिमुख व्हावे यासाठी विविध लिपींतील डोमेन सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. आशिया खंडातील आणि आखातातील (गल्फ नेशन्स) विविध लिपींमध्ये डोमेन सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. यात भारतातील २२ लिपींचा समावेश करण्यात आला होता. या निर्णयाची आता येत्या २१ ऑगस्टपासून अमलबजावणी सुरू होणार आहे. नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया ही सेवा सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे सीईओ गोविंद यांनी दिली.
सी-डॅकने इंटरनेट विषयीच्या नव्या धोरणाचे स्वागत केले आहे. मागील चाळीस वर्षापासून फक्त लॅटीन आणि अन्य युरोपियन लिपींमध्ये डोमेन उपलब्ध होते मात्र नव्या धोरणामुळे भारतीयांना त्यांच्या मायबोलीत वेबसाइटचा पत्ता तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे नवे इंटरनेट धोरण भारतीयांसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे सी-डॅकचे म्हणणे आहे. सध्या भारतात डॉट इन ही लॅटीन लिपीतली डोमेन सेवा आहे. आता त्याची जागा '.भारत' हे देवनागरी लिपीतले डोमेन घेईल असेही सी-डॅकने स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment